मराठी फलक हटविणाऱ्या पोलीस व कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा; महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक!

मराठी फलक हटविणाऱ्या पोलीस व कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा; महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक!

१ नोव्हेंबरपूर्वी मराठी फलक जबरदस्तीने झाकल्याचा आरोप; फोटो आणि व्हिडिओंसह पोलीस आयुक्तांना दिली माहिती, कारवाई न झाल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहरातील मराठी भाषेतील व्यावसायिक फलक आणि सामाजिक संघटनांचे फलक जबरदस्तीने झाकण्याचे अथवा हटविण्याचे प्रकार घडल्याचा आरोप करत संबंधित पोलीस अधिकारी आणि कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे.

१ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेले व्यावसायिक आस्थापनांचे फलक तसेच सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांचे फलक कोणतीही कायदेशीर नोटीस किंवा पूर्वसूचना न देता जबरदस्तीने झाकण्यात अथवा हटविण्यात आल्याचा आरोप समितीने निवेदनात केला आहे.

खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मराठी भाषेतील फलक हटविण्याच्या प्रकाराबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविला होता. कॉलेज रोडवरील सम्मन हॉटेलसमोरील शिवसेना ऑटो स्टँडचा अनेक वर्षांपासून असलेला मराठी फलकही कोणतीही कायदेशीर नोटीस न देता जबरदस्तीने झाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या परिसरात ६० टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक लोकसंख्या असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

मराठी भाषेत व्यवसाय करणाऱ्या खासगी व्यावसायिकांच्या फलकांनाही लक्ष्य केले जात असून, कन्नड संघटनेचे काही कार्यकर्ते स्वतः कायदा हातात घेऊन मराठी फलक हटविण्याचे किंवा झाकण्याचे प्रकार करत असल्याचा आरोप समितीने केला आहे. या प्रकारामुळे मराठी भाषिक व्यावसायिकांच्या भाषिक आणि घटनात्मक अधिकारांवर गदा येत असल्याचे समितीने म्हटले आहे.

यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे आणि कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. संबंधित घटनांचे फोटो आणि व्हिडिओदेखील पोलीस आयुक्तांना दाखविण्यात आले. या प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिले.

दरम्यान, प्रशासनाने कन्नड संघटनांच्या अशा बेकायदेशीर कृत्यांना वेळीच आळा घालावा. अन्यथा मराठी भाषिकांना जशास तसे उत्तर द्यावे लागेल, असा ठाम इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने देण्यात आला. मराठी भाषिकांच्या हक्कांवर गदा आणण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी भूमिका यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते. मराठी भाषिकांच्या फलकांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या भाषिक अधिकारांसाठी समिती आक्रमक भूमिका घेणार असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × three =

error: Content is protected !!