विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाले व्यासपीठ; पर्यावरणपूरक आकाश कंदिलांसह ७० हून अधिक दिवाळी अंकांचे प्रदर्शन
बेळगाव : द. म. शि. मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेल्या आकर्षक आकाश कंदील आणि विद्यार्थ्यांच्या लेखणीतून साकारलेल्या दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळेचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, मुख्याध्यापक बी. जी. पाटील, नारायण उडकेकर, शिक्षण समन्वयक सविता पवार, नीला आपटे बालमंदिर प्रमुख सीमा कंग्राळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता सहावीची विद्यार्थिनी स्वरा नीलजकर हिने प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आकाश कंदिलांचे तोरण बांधून आणि दिवाळी अंकांचे प्रकाशन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
या उपक्रमात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून विविध आकर्षक आकाश कंदील तयार केले होते. विशेष म्हणजे या आकाश कंदिलांवर विविध सामाजिक संदेश देण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव आणि जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी आपले समाजभान व्यक्त केले.
यासोबतच विद्यार्थ्यांनी तयार केलेले ७० हून अधिक दिवाळी अंक प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले. या अंकांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या कविता, कथा, प्रवासवर्णने, विनोदी चुटके, कोडी, चित्रे आणि संवाद यांचा समावेश होता. प्रत्येक अंकाची आकर्षक नावे आणि कल्पक मुखपृष्ठे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन आणि साहित्याची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी तसेच कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेत खऱ्या अर्थाने साहित्याची दिवाळी साजरी केली.
आकाश कंदील निर्मितीसाठी कला शिक्षिका लता नगरे आणि स्वानंद टकेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती परमोजी हिने केले, तर अनिश सूर्यवंशी याने आभार मानले.
