शिक्षण महर्षी परशुराम भाऊ नंदीहल्ली यांच्या हस्ते फलकाचे अनावरण; विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्यांची रुजवण करण्याचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि सेवाभाव रुजावा, या उद्देशाने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष उपक्रमांतर्गत हिंडलगा हायस्कूल, हिंडलगा येथे चौथ्या फलकाचे अनावरण करण्यात आले. शाळेचे संस्थापक आणि माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहल्ली यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले.
जायंट्सच्या G-I-A-N-T-S या सहा मूलभूत मूल्यांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये Generosity (औदार्य), Integrity (अखंडता), Action (कार्यनिष्ठता), Nobility (स्वाभिमान), Truthfulness (सत्यनिष्ठता) आणि Service (सेवा) या मूल्यांचा समावेश आहे. शाळेत येताना आणि जाताना विद्यार्थ्यांच्या नजरेस हे फलक पडत राहिल्याने त्यांच्या मनावर या मूल्यांचे संस्कार होतील आणि भविष्यात समाजसेवेची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित असलेले शाळेचे संस्थापक व माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहल्ली यांच्या शैक्षणिक कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांनाही शिक्षणाची संधी मिळावी, या दृढ विश्वासातून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळा स्थापन करण्याचे कार्य केले. वीज नसताना कंदिलाच्या प्रकाशात काम करून त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामीण जनतेमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली. लोकांचा विरोध आणि अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी ४० गावांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला. आजही वयाच्या या टप्प्यावर प्रत्येक शाळेशी संपर्क ठेवून ते शैक्षणिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या या योगदानामुळे त्यांचा उल्लेख शिक्षण महर्षी असा करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत बहादूरवाडी येथील पहिल्या फलकापासून सुरू झालेली मोहीम आता चार शाळांपर्यंत पोहोचली आहे. या चारही फलकांसाठी जायंट्स ग्रुपचे सदस्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व विजय कांग्राळकर यांनी प्रायोजकत्व दिले.
याप्रसंगी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष मधू बेळगावकर, संचालक मंडळाचे सदस्य आकाश लाटूकर, पुंडलिक पावशे, वाय. एन. पाटील, माजी सचिव प्रदीप चव्हाण, सदस्य प्रकाश तानजी, भास्कर कदम आणि बेळगुंदकर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाला संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी अध्यक्ष लक्ष्मण शिंदे आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन यांच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच औदार्य, प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा आणि सेवाभाव यांसारखी मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
