१९१८ मधील ११४ मराठा जवानांच्या शौर्याला अभिवादन; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण
बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी १०८ वा शर्कत दिन रेजिमेंटल अभिमान आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. १९१८ मधील मेसोपोटेमिया मोहिमेदरम्यान अद्वितीय शौर्य गाजवणाऱ्या आणि सर्वोच्च बलिदान देणाऱ्या ११४ मराठा जवानांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आले. त्यांच्या पराक्रमामुळे मराठा लाईट इन्फंट्रीला ‘शर्कत’ हा युद्धसन्मान प्राप्त झाला असून, हा सन्मान आजही रेजिमेंटच्या शौर्य, त्याग आणि लष्करी परंपरेचे प्रतीक मानला जातो.
शर्कत दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात शर्कत युद्धस्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, एसएम**, व्हीएसएम यांच्या हस्ते शूर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यानंतर विशेष सैनिक संमेलन आणि संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सेवारत सैनिक, अग्निवीर आणि माजी सैनिक सहभागी झाले. या संमेलनातून रेजिमेंटमधील एकजूट, बंधुभाव आणि गौरवशाली परंपरेचे स्मरण करण्यात आले.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण
या सोहळ्यात हिंदवी स्वराज्याच्या काळातील मराठा सैन्याचे पराक्रमी सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण हा विशेष आकर्षणाचा विषय ठरला. रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्या हस्ते अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते उपस्थित होते. त्यांनी हा अर्धपुतळा रेजिमेंटल सेंटरला भेट दिला.
तसेच तळेकर ड्रिल स्क्वेअर येथे उभारण्यात आलेल्या सलामी फ्रेमचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे रेजिमेंटच्या गौरवशाली परंपरा आणि ऐतिहासिक वारशाला आणखी उजाळा मिळाला.
सांस्कृतिक कार्यक्रमातून रेजिमेंटल एकतेचे दर्शन
शर्कत दिनाच्या कार्यक्रमाची सांगता सायंकाळी आयोजित बाराखाना आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमात सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला. एकता, बंधुभाव आणि रेजिमेंटल अभिमानाचे दर्शन घडविणाऱ्या या सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
१०८ व्या शर्कत दिनाच्या निमित्ताने मराठा लाईट इन्फंट्रीच्या शौर्य, निःस्वार्थ सेवा आणि कर्तव्याप्रती अढळ निष्ठा या मूल्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. रेजिमेंटच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेत भावी पिढ्यांनीही या परंपरा जपाव्यात, असा संदेश या स्मृतिदिनातून देण्यात आला.
