बेळगाव : शिरूर धरणात पाय घसरून पडल्याने बुडालेल्या २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह शोधपथकाने अथक प्रयत्नांनंतर दुसऱ्या दिवशी बाहेर काढला. आशीष अशोक राजगोळकर असे मृत तरुणाचे नाव असून, तो बेळगाव येथील शिवाजीनगर पाचव्या क्रॉसचा रहिवासी होता. तो वेगा हेल्मेट कंपनीत कामाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आशीष हा काल संध्याकाळी शिरूर धरण परिसरात असताना अचानक पाय घसरून धरणाच्या पाण्यात पडला. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांच्या रेस्क्यू टीमचे सदस्य अवधूत तुडवेकर आणि पद्मप्रसाद हूली यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य व शोधमोहीम सुरू केली.
या शोधमोहिमेत सोशल वर्कर रेस्क्यू टीम, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे सहभाग घेतला. सातत्याने शोध घेतल्यानंतर आज सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आले.
या कठीण मोहिमेदरम्यान सामाजिक कार्यकर्ते, SDRF जवान आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता, समन्वय आणि सेवाभावाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
