मल्लांसाठी मोफत भोजन व निवासाची व्यवस्था; मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशनतर्फे आयोजन
कर्नाटक : बेधडक बेळगाव वृत्तसेवा
ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह त्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ आणि २८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून, राज्यातील २२ जिल्ह्यांमधून मुले व मुली मिळून ४७० हून अधिक मल्लांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
दोन दिवस रंगणार कुस्तीचे सामने
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता खेळाडूंचे वजन मोजण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून कुस्तीच्या सामन्यांना सुरुवात होईल. सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
दुसऱ्या दिवशी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळपासून कुस्तीचे सामने सुरू राहतील. दिवसभर विविध गटांतील अंतिम सामने खेळविण्यात येणार असून, सायंकाळी समारोप सोहळा आणि बक्षीस वितरणाने स्पर्धेची सांगता होणार आहे.
खेळाडूंसाठी मोफत भोजन व निवास
राज्याच्या विविध भागांतून सहभागी होणाऱ्या मल्लांची गैरसोय होऊ नये, यासाठी आयोजकांनी विशेष व्यवस्था केली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी दोन दिवसांच्या निवासासह सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या राज्यस्तरीय स्पर्धेला क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी आणि राज्यातील कुस्तीला प्रोत्साहन मिळावे, हा या स्पर्धेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मल्लांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष पै. अतुल शिरोले आणि मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक राज्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
स्पर्धेचे ठिकाण- सामर्थ्य मंदिर व्यायाम शाळा,बुधवार पेठ,टिळकवाडी,बेळगाव
