काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा : अंकुश केसरकर

काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा : अंकुश केसरकर

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत आवाहन; मराठी भाषिकांना डिवचणाऱ्या नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या निषेधाचा ठराव

बेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांची व्यापक बैठक युवा समितीच्या कावळे संकुल येथील कार्यालयात अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

भाषावार प्रांतरचनेच्या वेळी मराठीबहुल सीमाभाग तत्कालीन केंद्र सरकारने कन्नड भाषिक म्हैसूर राज्यात अन्यायाने समाविष्ट केला, अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीने मांडली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ १९५६ पासून दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. यंदाही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात जाण्याची मराठी भाषिकांची इच्छा आजही कायम असून, ती तसूभरही कमी झालेली नाही, हे दाखवून देण्यासाठी सर्वांनी मूक सायकल फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले. तसेच मराठी भाषिकांना डिवचणाऱ्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या निषेधाचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.

सीमाप्रश्न सुटेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत माजी नगरसेवक राजू बिर्जे म्हणाले की, आता मुंबईपासून दिल्लीपर्यंत जोरदार प्रयत्न करून हा प्रश्न सोडवून घेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा. मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा प्रबळ असल्याचे दाखवून देण्यासाठी काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

युवकांना आवाहन करताना संतोष कृष्णाचे यांनी सोशल मीडियावर भडकावू पोस्ट टाकण्याऐवजी लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सीमाप्रश्नाबाबत जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अश्वजित चौधरी, सूरज चव्हाण, साईनाथ शिरोडकर, विनायक कावळे आणि आकाश भेकणे यांनी आपले विचार मांडले. बैठकीला उपाध्यक्ष गुंडू कदम यांच्यासह सूरज कुडुचकर, महेश जाधव, सूरज चव्हाण, सौरभ तोंडले, गजानन बैलूरकर, महेश चौगुले आणि निखिल देसाई उपस्थित होते.

बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी केले, तर चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six + nine =

error: Content is protected !!