पॅराग्वे येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व; अल्पाइन स्पीड स्लालोम प्रकारात टॉप १० मध्ये स्थान
बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर साईराज मेंडके याची दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे शहरात झालेल्या जागतिक स्केटिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून अल्पाइन स्पीड स्लालोम प्रकारात टॉप १० मध्ये स्थान मिळवत साईराजने उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेनंतर बेळगाव विमानतळावर आगमन झालेल्या साईराजचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होण्याकरिता चंदीगड येथे निवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत साईराजने आपल्या कौशल्याच्या जोरावर स्थान मिळवले. गेल्या १२ वर्षांपासून तो स्केटिंगचे प्रशिक्षण घेत असून, जागतिक स्पर्धेतील निवडीसाठी त्याने रात्रंदिवस कठोर मेहनत घेतली होती. त्याच्या या सातत्यपूर्ण सरावाचे आणि जिद्दीचे फळ त्याला भारतीय संघात निवड होऊन मिळाले.
जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभागी होत टॉप १० मध्ये स्थान मिळवणे ही साईराजसाठी महत्त्वाची कामगिरी ठरली आहे. त्याच्या या यशामुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्केटिंग क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बेळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते साईराजला पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी मंजुनाथ मंडोळकर, श्रीकांत मेंडके, अर्चना मेंडके, विनोद बामणे, ज्योती बामणे, नैना शिवराज, शिवराज, लीना कोरीशेट्टी, संगीता अंकले, चौकसिंग पुरोहित, यशपाल पुरोहित, प्रशांत कांबळे, भक्ती हिंडलगेकर यांच्यासह बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे पालक आणि स्केटर्स उपस्थित होते.
साईराजच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी स्पर्धांमध्येही तो अशीच उज्ज्वल कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
