उत्कर्ष महिला मंडळाच्या दुर्गापूजनाने आनंदनगरात भक्तिमय वातावरण

उत्कर्ष महिला मंडळाच्या दुर्गापूजनाने आनंदनगरात भक्तिमय वातावरण

दुर्गादेवीचे पूजन, शिवपिंडी व नंदीपूजनासह भजनसेवेने कार्यक्रमाची सांगता

बेळगाव : प्रतिनिधी

आनंदनगर पहिला क्रॉस येथील शिवमंदिरात उत्कर्ष महिला मंडळातर्फे शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी दुर्गापूजनाचा कार्यक्रम भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. दुर्गादेवीच्या पूजनाने मंदिर परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले. देवीचा जयघोष, आरती आणि भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी पाटील आणि उपाध्यक्षा चंदा घाडी यांच्या हस्ते दुर्गादेवीच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मंडळाच्या सचिव शिवाणी पाटील यांच्या हस्ते शिवपिंडीचे, तर अध्यक्षा शुभांगी पाटील यांच्या हस्ते नंदीचे पूजन करण्यात आले. धार्मिक विधी पार पडल्यानंतर देवीची आरती करण्यात आली.

यावेळी अध्यक्षा शुभांगी पाटील यांनी दुर्गादेवीच्या नऊ रूपांचे महत्त्व विशद केले. तसेच प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेल्या देवीच्या शक्तिरूप गुणांची जाणीव करून देत महिलांमधील सामर्थ्य, धैर्य आणि सकारात्मकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

यानंतर धनश्री बर्गे यांच्या भक्तिमय भजनसेवेने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांच्या भजनांनी उपस्थित महिला भक्तिमय वातावरणात तल्लीन झाल्या.

धार्मिक परंपरा जपत महिलांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून भक्तिभाव, महिला एकजूट आणि सामूहिक सहभागाचे दर्शन घडले.

या कार्यक्रमाला मंडळाच्या पदाधिकारी हेमलता कानशिडे, सुनीता पाटील, विमल साळी, स्मिता वेसणे, मंगल पाटील, शारदा मुरकुटे, वनिता पाटील, सीमा जुवेकर, सुमन कांदेकर, सुचेता पेंडसे, प्रेमा तमुचे आणि दीपा सुतार यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − ten =

error: Content is protected !!