बेळगाव : टिळकवाडी येथील समर्थ मंदिर ट्रस्टच्या व्यवस्थापनाकडून मध्यमवर्गीय व गरीब शरीरसौष्ठवपटूंना त्रास दिला जात असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक विनायक जी. गुंजीकर यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. समर्थ मंदिर ट्रस्टचा भाडेकरार रद्द करून संबंधित जागेचा ताबा महापालिकेने घ्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
विनायक गुंजीकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, टिळकवाडी येथील बुधवार पेठ परिसरातील समर्थ मंदिर ट्रस्टची जागा बेळगाव महापालिकेच्या मालकीची आहे. १३ डिसेंबर १९४४ रोजी तत्कालीन बेळगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि समर्थ मंदिराचे अध्यक्ष बी. आर. कुलकर्णी यांच्यात या जागेबाबत करार झाला होता. या करारातील सहाव्या कलमानुसार, संबंधित जागा आणि त्यावरील इमारतींचा वापर केवळ व्यायामशाळा चालविण्यासाठी करण्याची अट असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, सध्या या परिसराचा वापर मंदिर, कार्यालय, बॅडमिंटन हॉल यांसारख्या विविध कारणांसाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच पहिल्या मजल्यावर दुसरा मजला बांधण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
समर्थ मंदिर व्यायामशाळा ही शहरातील जुन्या आणि प्रसिद्ध व्यायामशाळांपैकी एक असून, येथे प्रशिक्षण घेतलेल्या अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. काही खेळाडूंनी आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्येही सहभाग घेतल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. १९९२ पासून आपण या व्यायामशाळेत जात असून, येथे प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांतील युवक प्रशिक्षण घेतात, असे गुंजीकर यांनी म्हटले आहे.
व्यायामशाळेत दरवर्षी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी यांसारखे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. तसेच गणेशोत्सवाच्या काळात सात दिवस श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र, यंदा व्यवस्थापनाने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवातीला परवानगी नाकारल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
पूर्वी अत्यल्प भाडे आकारून ही जागा व्यायामशाळेसाठी देण्यात आली होती. कालांतराने भाडे वाढले असले, तरी गरीब व मध्यमवर्गीय युवकांना व्यायामाचा लाभ मिळवून देणाऱ्या या संस्थेच्या मूळ उद्देशाला प्राधान्य मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून संबंधित व्यवस्थापनावर योग्य ती कारवाई करावी. तसेच करारातील अटींचे उल्लंघन झाले असल्यास भाडेकरार रद्द करून जागेचा ताबा महापालिकेने घ्यावा, अशी मागणी विनायक जी. गुंजीकर यांनी केली आहे.
टीप : आरोप हे तक्रारदाराने केलेले दावे आहेत; त्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.
