बेळगाव : बेधडक बेळगावच्या वतीने मध्यवर्ती नवरात्र उत्सव महामंडळ, बेळगाव यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बेधडक शक्तिस्वरूप’ उत्कृष्ट नवरात्र उत्सव मंडळ स्पर्धा २०२६ साठी नावनोंदणी सुरू असून, नावनोंदणी करण्यासाठी १४ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बेळगाव शहर आणि तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांनी त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेत देवीची मूर्ती, मंडळाचा देखावा आणि मंडळाकडून करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याच्या आधारे गुणांकन केले जाणार आहे. एकूण गुणांपैकी ५० टक्के गुण देवीच्या मूर्तीसाठी, तर उर्वरित ५० टक्के गुण मंडळाचा देखावा आणि सामाजिक कार्यासाठी दिले जाणार आहेत.
परीक्षकांच्या गुणांसोबतच बेधडक बेळगावच्या सोशल मीडिया पेजवर संबंधित मंडळाच्या व्हिडिओला मिळणाऱ्या पसंतीचाही विचार केला जाणार आहे. १५ ऑक्टोबरपासून मंडळांचे व्हिडिओ बेधडक बेळगावच्या पेजवर अपलोड केले जातील. विजयादशमीपर्यंत मिळालेल्या लाईक्सचीच मोजणी करण्यात येईल. व्हिडिओ बूस्ट करून किंवा बनावट लाईक्स वाढवून स्पर्धेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित मंडळाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
स्पर्धेचे प्रवेश शुल्क ५०० रुपये असून, ज्या मंडळात देवी विराजमान होते, अशाच मंडळांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. नावनोंदणीसाठी मंडळाचे नाव, संपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे.
बेळगाव परिसरातील नवरात्र उत्सव मंडळांसाठी आयोजित या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या मंडळाचा नावलौकिक वाढवावा. नावनोंदणीसाठी ९७४२८१४०२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बेधडक बेळगावच्या वतीने करण्यात आले आहे.
