जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल गौरव; गजराज बुक स्टॉल व बाल संभाजी युवक मंडळाचा उपक्रम
बेळगाव : प्रतिनिधी
कंग्राळी बुद्रुक येथील स्वरा अनिल पावशे आणि माधुरी गजानन पाटील यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल गजराज बुक स्टॉल आणि बाल संभाजी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सत्कार करण्यात आला. या दोन्ही युवतींनी धावण्याच्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून गावाचा नावलौकिक वाढविला आहे.
बेळगाव शाळा शिक्षण मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये स्वरा अनिल पावशे हिने १०० मीटर आणि ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तर माधुरी गजानन पाटील हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांच्या या यशाबद्दल गावातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष दत्ता पाटील, उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, सदस्य दादासाहेब भदर्गडे, विश्वनाथ पाटील आणि अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ता पाटील होते. यल्लाप्पा पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी गजराज बुक स्टॉलचे मालक अमोल पाटील यांच्या हस्ते स्वरा पावशे आणि माधुरी पाटील यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यल्लोजी पाटील यांनी खेळाडूंच्या यशाचे कौतुक करताना त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे कष्ट आणि पाठिंबा महत्त्वाचा असल्याचे सांगितले. तसेच दोन्ही खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दादासाहेब भदर्गडे यांनीही खेळाडूंचे अभिनंदन करत तरुण पिढीने शारीरिकदृष्ट्या सुदृढ बनण्यासाठी खेळांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
गजराज बुक स्टॉलचे मालक अमोल पाटील यांनी तरुणांनी अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्राकडेही लक्ष द्यावे, असे सांगितले. तसेच व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला मनोज पाटील, सुधीर पाटील, भूषण पाटील, माया पाटील, शीतल पावशे, सोनम पाटील तसेच बाल संभाजी युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन यल्लाप्पा पाटील यांनी केले.
