‘प्रहार’मधील मेजर व्ही. एस. चव्हाण यांच्या भूमिकेतून मराठा सैनिकांचे शौर्य अधोरेखित करणारे नाना पाटेकर यांना मराठा लाईट इन्फंट्रीची श्रद्धांजली

‘प्रहार’मधील मेजर व्ही. एस. चव्हाण यांच्या भूमिकेतून मराठा सैनिकांचे शौर्य अधोरेखित करणारे नाना पाटेकर यांना मराठा लाईट इन्फंट्रीची श्रद्धांजली

बेळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि प्रादेशिक सैन्यदलाचे मानद लेफ्टनंट कर्नल नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल मराठा लाईट इन्फंट्री परिवाराने तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाना पाटेकर यांचे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि भारतीय सैनिकांविषयीचा आदर यांची आठवण रेजिमेंटने आपल्या श्रद्धांजली संदेशातून करून दिली आहे.

नाना पाटेकर यांचा मराठा लाईट इन्फंट्रीशी संबंध त्यांच्या गाजलेल्या ‘प्रहार : द फायनल अटॅक’ या चित्रपटाच्या निमित्ताने आला. या चित्रपटासाठी त्यांनी बेळगाव येथे तीन वर्षे कठोर लष्करी प्रशिक्षण घेतले होते. चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘काली पांचवी’ बटालियनचे मेजर व्ही. एस. चव्हाण ही भूमिका विशेष गाजली. या भूमिकेतून मराठा सैनिकांचे शौर्य, शिस्त आणि जिद्द प्रभावीपणे पडद्यावर साकारली गेली.

नाना पाटेकर यांचे रेजिमेंटशी असलेले नाते केवळ चित्रपटापुरते मर्यादित नव्हते. मराठा लाईट इन्फंट्री परिवारातील सदस्यांशी त्यांचा सातत्याने स्नेहपूर्ण संपर्क होता. रेजिमेंटच्या जवानांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जपले होते. १९९९ मधील कारगिल युद्धाच्या काळात त्यांनी भारतीय सैन्यदलातील जवानांसोबत केलेल्या सेवेमधून गणवेशाविषयीचा आदर आणि राष्ट्राप्रती असलेली बांधिलकीही दिसून आली.

मराठा लाईट इन्फंट्रीचे कर्नल तसेच मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

‘प्रहार’ चित्रपटातील मेजर व्ही. एस. चव्हाण यांच्या अजरामर भूमिकेमुळे मराठा सैनिकांचे शौर्य आणि रेजिमेंटची गौरवशाली परंपरा प्रेक्षकांच्या मनात कायम राहील. नाना पाटेकर यांनी रेजिमेंट आणि तिच्या जवानांशी जपलेले मैत्रीपूर्ण नाते ही त्यांची कायम स्मरणात राहणारी अमूल्य परंपरा असल्याचे मराठा लाईट इन्फंट्रीने श्रद्धांजली संदेशात नमूद केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − 10 =

error: Content is protected !!