बेळगाव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; सहा घरफोड्यांचा छडा, २६.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; सहा घरफोड्यांचा छडा, २६.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घरफोडीच्या सहा गुन्ह्यांचा छडा लावत २६ लाख ५३ हजार ४०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

२ ऑक्टोबर २०२६ रोजी हुंच्यानट्टी येथील स्वामी विवेकानंद नगरातील रहिवासी लक्ष्मी सिद्धराम रामण्णावर यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २१८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५(ए) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय नागनगौडा कट्टीमनिगौडर यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय संतोष दळवाई आणि पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासादरम्यान रोहन रूपेश पाटील (वय ३०, रा. क्रांतीनगर, गणेशपूर; सध्या श्रीहरी अपार्टमेंट, दुसरा रेल्वे गेट, टिळकवाडी, बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान संशयिताने दिवसा स्कूटरवरून फिरून हुंच्यानट्टी आणि मच्छे परिसरातील एकूण सहा घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

२६.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी संशयिताकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे.

  • सोन्याचे दागिने: १६१ ग्रॅम, किंमत २३ लाख ८८ हजार ४०० रुपये.
  • चांदीच्या वस्तू: १ किलो, किंमत २ लाख ३० हजार रुपये.
  • स्कूटर: चोरीसाठी वापरलेली केए-२२/ईयू-२१६० क्रमांकाची स्कूटर, किंमत ३५ हजार रुपये.
  • इतर साहित्य: लोखंडी उळी, कटर, स्क्रूड्रायव्हर आणि पान्हे.

अशा प्रकारे एकूण २६ लाख ५३ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पीआय नागनगौडा कट्टीमनिगौडर, पीएसआय संतोष दळवाई, पीएसआय लक्ष्मण जोडट्टी, पीएसआय व्ही. डी. सरनायक तसेच पोलीस कर्मचारी सतीश नायकवाड, श्रीकांत उप्पार, मारुती कोटबागी, बाळेश पडनाड, आनंद कोटगी, शिवानंद वर्चगल्ल, तांत्रिक विभागातील रमेश अक्की, महादेव काशिद आणि दीपक दोड्डगोणी यांनी सहभाग घेतला.

या कामगिरीबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × four =

error: Content is protected !!