आजीवन शैक्षणिक योगदान पुरस्काराने गौरव; प्रसिद्ध अभिनेते सुदेश बेरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
बेळगाव : बेनकनहळ्ळी येथील बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमीमध्ये माध्यमिक हिंदी विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या शिवांगी राहुल मोदगेकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित ‘बेला टिचर्स अवॉर्ड – आजीवन शैक्षणिक योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते सुदेश बेरी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रातील समर्पण, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान यांची दखल घेत शिवांगी मोदगेकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अनेक अर्जांमधून त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.
शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, संस्कार आणि विविध कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाप्रती असलेल्या समर्पणामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमीसह विविध स्तरांतून अभिनंदन आणि कौतुक होत आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव झाला असून, त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
