भातपीक हाताशी आले, पण तोंडात जाण्याची शाश्वती नाही; करपा रोगामुळे शेतकरी चिंतेत

भातपीक हाताशी आले, पण तोंडात जाण्याची शाश्वती नाही; करपा रोगामुळे शेतकरी चिंतेत

पावसाने दडी मारल्याने भातपिकांना फटका; येळ्ळूर, शहापूर, वडगाव, अनगोळ परिसरातील शेतकरी संकटात

बेळगाव : येळ्ळूर, शहापूर, वडगाव, अनगोळ यांसह परिसरातील काही भागांत भातपीक कापणीच्या टप्प्यावर आले असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. जमिनीतील ओलावा कमी होणे आणि त्यातच उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने भातपिकांवर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे हाताशी आलेले पीक पदरात पडेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

या भागात बासमती, इंद्रायणी, सोनम, शुभांगी, सुपर सोनम, एमपी, दप्तरी यांसह विविध जातींची भातपिके घेतली जातात. यंदा काही प्रमाणात तरी भाताचे उत्पादन मिळून कुटुंबाची गरज भागेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. त्यातच वाढत्या उन्हामुळे पिकांवर विपरीत परिणाम होत असून, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

येत्या पंधरा दिवसांत अनेक ठिकाणी भात कापणीला येण्याची शक्यता असतानाच पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वर्षभर मेहनत करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर खराब होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेले धान्य तरी हातात पडेल का, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि कर्जमाफीची मागणी

या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने परिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त भातपिकांचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी कर्जमाफीसारखा ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

शेतीवरच अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करताना आर्थिक आधार मिळणे अत्यावश्यक आहे. वेळीच मदत मिळाली नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गंभीर होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकारने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने मदतीची पावले उचलावीत, अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + thirteen =

error: Content is protected !!