भव्य दसरा महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मध्यवर्ती दसरा महामंडळाचे पालिकेला निवेदन

भव्य दसरा महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मध्यवर्ती दसरा महामंडळाचे पालिकेला निवेदन

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगावचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला दसरा महोत्सव यंदाही उत्साहात, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा करण्याच्या दृष्टीने मध्यवर्ती दसरा महोत्सव महामंडळ, बेळगावच्या वतीने सोमवारी महानगरपालिका प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. महानगरपालिका आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्त श्रीमती लक्ष्मी निपाणीकर यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून मध्यवर्ती दसरा महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये दसरा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध, देखणा आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा केला जात आहे. ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यासाठी उत्सवाच्या पूर्वतयारीची कामे वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे महामंडळाच्या वतीने निवेदनातून स्पष्ट करण्यात आले.

दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, विद्युत रोषणाई, स्वच्छता व्यवस्था तसेच मुख्य सीमोल्लंघन कार्यक्रमाच्या जागेची आवश्यक पूर्वतयारी प्रशासनाने वेळेत पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच महामंडळ आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यातील समन्वयातून उत्सवाशी संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संयुक्तपणे कार्यवाही सुरू करावी, अशी विनंती करण्यात आली.

या निवेदनामुळे दसरा महोत्सवाच्या तयारीला प्रशासनाच्या पातळीवरही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शहरातील नागरिकांना आणि दसरा उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधा आणि व्यवस्थांची वेळेत पूर्तता करण्यावर महामंडळाने भर दिला.

मान्यवरांची उपस्थिती

निवेदन सादर करताना मध्यवर्ती दसरा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, उपाध्यक्ष संदीप कामुले, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांच्यासह विविध देवस्थानांचे प्रतिनिधी आणि महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री देव दादा सासणकठी देवस्थानचे लक्ष्मण किल्लेकर, श्रीनाथ पवार, पंकज किल्लेकर, गिरीश पाटील आणि सौरभ पवार, मारुती गल्ली मारुती देवस्थानचे प्रमोद बिरजे, मातंगी देवस्थान (कसाई गल्ली)चे बुद्रुद्दीन, वीरभद्र देवस्थान (अशोक नगर)चे मुर्गेंद्र अंगडी, तसेच महामंडळाचे पदाधिकारी किरण हूद्दार, हर्षल नाईक, ज्योतिबा धामणेकर आणि प्रसाद मरगाळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यंदाचा दसरा महोत्सवही उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी महामंडळ व महानगरपालिका प्रशासनाच्या समन्वयातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 2 =

error: Content is protected !!