५,२३० माजी सैनिक, वीर नारी, आश्रित व कुटुंबीयांचा सहभाग; २४ कंपन्यांकडून ७२८ रोजगार संधी
बेळगाव | बेधडक बेळगाव वृत्तसेवा
द मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (MARATHA LIRC), बेळगाव आणि द मराठा लाइट इन्फंट्री रेकॉर्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने, मुख्यालय दक्षिण भारत क्षेत्र तसेच कर्नाटक व केरळ सब एरियाच्या मार्गदर्शनाखाली त्रि-सेवा माजी सैनिक मेळावा आणि रोजगार मेळावा रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी शिवाजी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात सुमारे ५,२३० माजी सैनिक, वीर नारी, आश्रित आणि कुटुंबीयांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला कर्नाटक व केरळ सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल भारत मेहतानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. द मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट, ओआयसी रेकॉर्ड्स आणि स्टेशन कमांडर ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, SM, VSM यांच्या नेतृत्वाखाली तसेच बेळगावमधील विविध स्टेशन युनिट्सच्या समन्वयातून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश के. एन. शिवकुमार आणि एअरमन ट्रेनिंग स्कूल, सांबरा येथील कमांडंट एअर कमोडोर सूरज शंकर यांचीही उपस्थिती होती.
ज्येष्ठ युद्धवीरांचा विशेष सन्मान
मेळाव्यात उल्लेखनीय सेवा बजावलेल्या दोन ज्येष्ठ माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. मद्रास रेजिमेंटचे माजी सैनिक सुभेदार शांतय्या, SM यांनी १७ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावत १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक संघर्षात सहभाग घेतला. शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेसाठी त्यांना सेना पदक प्रदान करण्यात आले होते. १९७२ मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांनी त्यांचा वैयक्तिक सन्मान केला होता.
तसेच १७/५ मराठा लाइट इन्फंट्रीचे सिपाही दत्तू पाटील, वय १०३ वर्षे, यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४३ ते १९४६ या कालावधीत सेवा बजावली. त्यांना १९३९–४५ स्टार, बर्मा स्टार आणि वॉर मेडल प्राप्त झाले आहे. त्यांची सेवा परंपरा चार पिढ्यांपर्यंत कायम असून त्यांचा मुलगा १९ मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये, तर नातू आणि पणतू सिग्नल्स कोअरमध्ये सेवेत आहेत.
पेन्शन, वैद्यकीय व कायदेशीर सुविधा
मेळाव्यात २१ रेकॉर्ड कार्यालये आणि विविध संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी पेन्शन, SPARSH, कागदपत्रे, आधार, पॅन, बँकिंग आणि इतर कल्याणकारी सेवांबाबत मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून दिल्या.
माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय व दंत तपासणी शिबिरांसह विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. तसेच कायदेशीर मदतही देण्यात आली.
यावेळी मेजर जनरल भारत मेहतानी यांनी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. सेवेतून अपंगत्वामुळे बाहेर पडलेल्या १७४ जवानांसाठी सुमारे ₹१३ कोटी, ७९ लष्करी कुटुंबांसाठी ₹१.५ कोटी आणि ३ हजारांहून अधिक कुटुंबांना लाभ झालेल्या Post Discharge Claims अंतर्गत ₹१७.५ कोटींचे आर्थिक लाभ उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
माजी सैनिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या २४ तासांच्या हेल्पलाइनचा लाभ घेण्याचे आवाहन करताना त्यांनी SPARSH, पेन्शन आणि बँकिंगशी संबंधित माहितीच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले.
रोजगार मेळाव्यात ७२८ संधी
मेळाव्याचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या रोजगार मेळाव्यात २४ कंपन्यांनी सहभाग घेत ७२८ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. या संधींसाठी १,४७० उमेदवारांनी अर्ज केले.
याशिवाय ढोल-ताशा, जॅझ आणि सिल्व्हर बँडच्या सादरीकरणासह विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी मेळाव्याची रंगत वाढवली.
वीर नारी, माता आणि विधवांशी अधिक जवळून संवाद साधण्यासाठी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या सहभागातून विशेष संवाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. त्यांच्या समस्या, कल्याणकारी गरजा आणि अडचणी समजून घेण्यासाठी या माध्यमातून आपुलकीचे वातावरण निर्माण करण्यात आले.
माजी सैनिकांच्या कल्याण, आरोग्य, तक्रार निवारण आणि रोजगारासाठी एकाच ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देणारा हा मेळावा ठरला. या उपक्रमातून सशस्त्र दल, माजी सैनिक आणि नागरी समाज यांच्यातील दृढ नाते अधिक अधोरेखित झाले.
