विधायक उपक्रमांसह कै. आ. बी. आय. पाटील यांना श्रद्धांजली

विधायक उपक्रमांसह कै. आ. बी. आय. पाटील यांना श्रद्धांजली

कंग्राळी खुर्द | बेधडक बेळगाव वृत्तसेवा

कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र कै. आ. बी. आय. पाटील यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बाल हनुमान तालीम मंडळ आणि पाटील परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातील हुतात्मा चौक येथे कै. आ. बी. आय. पाटील यांच्या तैलचित्राला अग्निशमन दलाचे अधिकारी वेंकटेश टक्केकर आणि ॲड. सतीश बांदिवडेकर यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर महात्मा फुले कार्यालयात पौर्णिमा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित शेकडो नागरिकांनी एक मिनिट मौन पाळून कै. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.

यानंतर विविध मंडळांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी कै. आ. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यामध्ये ॲड. एम. जी. पाटील, भाऊ पाटील, यल्लापा पाटील, कल्लापा पाटील, सोमनाथ पाटील, प्रविण खांडेकर, संतोष बोभाटे, बाळाराम पाटील, मनोहर पाटील, भैय्या पाटील, महादेव पाटील, राजू प्रधान, अर्जुन अलगोंडी, एम. एन. पाटील, अरुण कोलकार यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले. यल्लापा पाटील यांनी श्रीफळ वाढविले. जे. आर. पाटील आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कै. पाटील यांच्या कार्याला उजाळा देत शाब्दिक श्रद्धांजली अर्पण केली.

खेळाडू आणि विद्यार्थ्यांचा गौरव

पाटील परिवाराच्या वतीने जिल्हास्तरीय तसेच दसरा स्पर्धेत विविध वजनी गटांत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळविणाऱ्या १२ मुला-मुलींचा रोख रक्कम व पुष्प देऊन गौरव करण्यात आला.

तसेच प्राथमिक शाळेतील २० हून अधिक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

गावातील ग्रंथालयासाठी स्पर्धा परीक्षा, सीईटी, जेईई यांसह विविध संदर्भग्रंथ, धार्मिक पुस्तके आणि बोधकथांची सुमारे १० हजार रुपये किमतीची पुस्तके भेट देण्यात आली.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शासकीय कोट्यातून एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या कु. समीक्षा संजय मोहनगेकर आणि कु. स्नेहा यल्लापा पावशे तसेच दिल्ली येथील इस्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड झालेल्या अथर्व राजू चव्हाण यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पौर्णिमा पाटील यांनी दरवर्षी अशाच प्रकारचे विधायक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाला आर. आय. पाटील, केंपान्ना सनदी, राकेश पाटील, प्रेमा पाटील, शिवाजी मुतगेकर, सरस्वती पाटील, रोहित पाटील यांच्यासह बाल हनुमान तालीम मंडळ, मसणाई युवक मंडळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, नवजागृती सेवा संघाचे कार्यकर्ते, पाटील परिवारातील सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किसन पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर टी. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty + five =

error: Content is protected !!