वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रंथालयाला दहा हजारांची पुस्तके भेट

वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रंथालयाला दहा हजारांची पुस्तके भेट

कंग्राळी खुर्द | बेधडक बेळगाव वृत्तसेवा

कंग्राळी खुर्द येथील तरुण अभियंते महेश मल्लू मोहनगेकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील सरकारी ग्रंथालयाला विविध विषयांवरील सुमारे दहा हजार रुपये किमतीची पुस्तके भेट देत विधायक उपक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाचे शिक्षणप्रेमी नागरिकांतून कौतुक होत आहे.

गावातील सरकारी ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी टी. डी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचे विधायक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर महेश मोहनगेकर यांचे वडील मल्लू मोहनगेकर यांच्या हस्ते ग्रंथपाल मधू पाटील यांच्याकडे विविध पुस्तके सुपूर्त करण्यात आली. यामध्ये पानिपत, ययाती, छावा, स्वामी विवेकानंद यांसारख्या कादंबऱ्या, स्पर्धा परीक्षा व सामान्य ज्ञानाची पुस्तके, इंग्रजी स्पीकिंग कोर्सची पुस्तके, छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी दहा वीर मावळ्यांचे चरित्रग्रंथ तसेच बोधकथा आदींचा समावेश आहे.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नित्यपूजेसाठी १,१११ रुपयांची देणगी देण्यात आली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना महेश मोहनगेकर यांनी या पुस्तकांचा शालेय विद्यार्थ्यांसह गावातील तरुण पिढीने अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन केले. तसेच यापुढेही आपल्या परिवाराच्या वतीने सातत्याने पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य भेट देत राहण्याचे त्यांनी सांगितले.

मराठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक गोपाळ लाड यांनीही मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमास माजी सदस्य प्रशांत पाटील, एसडीएमसी अध्यक्ष विक्रम मुतगेकर व त्यांचे सहकारी, मनोज मोहनगेकर, मराठी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

ग्रंथपाल मधू पाटील यांनी सरकारी ग्रंथालय शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शेवटी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 11 =

error: Content is protected !!