बेळगाव : प्रतिनिधी
बेळगावमधील बुडा स्कीम क्रमांक ५१ येथील अर्धवट अवस्थेत असलेल्या स्विमिंग पूलकडे लोकप्रतिनिधी आणि बुडा प्रशासन लक्ष देणार का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. माजी आमदार फिरोज सेठ यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेले स्विमिंग पूलचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
माजी आमदार फिरोज सेठ यांच्या कार्यकाळात या स्विमिंग पूलच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर माजी आमदार अनिल बेनके यांच्या कार्यकाळातही या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक वर्षे उलटूनही हे काम पूर्णत्वास न गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.
विशेष म्हणजे, सध्याचे आमदार हे माजी आमदार फिरोज सेठ यांचे बंधू असून ते बुडा अर्थात बेळगाव नागरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे आता तरी या अर्धवट स्विमिंग पूलच्या कामाला गती मिळणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या पैशातून सुरू करण्यात आलेले काम अर्धवट राहिल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. केवळ विकासकामांचे भूमिपूजन आणि सुरुवात न करता ती कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
बुडा अध्यक्ष आणि सध्याचे आमदार या नात्याने संबंधित लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्विमिंग पूलचे रखडलेले काम पूर्ण करणार का? की हे काम असेच अर्धवट राहणार, असा सवाल आता नागरिकांतून उपस्थित होत आहे.
