कर्नाटक स्पर्धा परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; बेळगावात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शक प्रशिक्षण संपन्न

कर्नाटक स्पर्धा परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; बेळगावात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शक प्रशिक्षण संपन्न

२ आणि ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर काटेकोर नियोजनाचे निर्देश; हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही – एम. एम. कांबळे

बेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक शासनाच्या वतीने आगामी २ आणि ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि कडक शिस्तीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या परीक्षांचे गांभीर्य आणि गोपनीयता लक्षात घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उच्चस्तरीय मार्गदर्शक प्रशिक्षण वर्ग येथील एस.जी.बी.आय.टी.च्या सेमिनार हॉलमध्ये नुकताच संपन्न झाला.

जिल्हाधिकारी रोशन बेग यांच्या निर्देश व मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाला बेळगाव व चिकोडी पदवीपूर्व विभागाचे उपसंचालक (डीडीपीयू) एम. एम. कांबळे आणि लिंगराजू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा ट्रेझरी अधिकारी विना मॅडम तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य पटगुंदी यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी बेळगाव व चिकोडी शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. नागराज मराण्णावर यांनी उपस्थितांना परीक्षेच्या नियमावलीसह विविध तांत्रिक बाबींचे सखोल मार्गदर्शन केले. पीपीटीच्या माध्यमातून त्यांनी परीक्षा आयोजनातील महत्त्वाच्या बाबी, घ्यावयाची खबरदारी आणि संभाव्य समस्यांवर उपाययोजना यांची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांच्या अनेक शंकांचे निरसन झाले.

नियोजनातील त्रुटी परीक्षा प्रक्रियेला बाधा आणू शकतात : एम. एम. कांबळे

प्रशिक्षण सत्रादरम्यान डीडीपीयू एम. एम. कांबळे यांनी आपल्या ओघवत्या आणि विनोदी शैलीतून परीक्षेच्या आयोजनातील गांभीर्य अधोरेखित केले. कोणतीही स्पर्धा परीक्षा ही केवळ कागदावरील औपचारिकता नसून ती अचूक नियोजन, पारदर्शकता आणि विश्वासावर अवलंबून असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

परीक्षा यंत्रणेतील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी अत्यंत दक्षतेने आणि निष्पक्षपणे पार पाडणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय प्रतिष्ठेची परीक्षा असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा नियोजनातील त्रुटी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

परीक्षा पूर्णपणे पारदर्शक, निष्कलंक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे हे सर्व संबंधितांचे सर्वोच्च कर्तव्य आहे. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर गोपनीयता राखणे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रशिक्षण सत्रामुळे परीक्षा आयोजनातील संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव अधिकारी व कर्मचाऱ्यांना झाली असून, आगामी परीक्षा कोणत्याही गैरप्रकाराला थारा न देता सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + eight =

error: Content is protected !!