गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचे महामंडळाकडून आभार

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचे महामंडळाकडून आभार

बेळगाव : प्रतिनिधी

यंदाचा श्री गणेशोत्सव शांतता, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या बेळगाव पोलीस प्रशासनाचे मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत (दादा) कोंडुसकर यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम तसेच डीसीपी नारायण बरमनी यांची भेट घेऊन गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका, भाविकांची गर्दी, वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. उत्सव शांततेत पार पडावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले.

विशेषतः अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने तब्बल ४२ तास अहोरात्र बंदोबस्त ठेवला होता. शहरातील प्रमुख चौक, विसर्जन मार्ग, संवेदनशील ठिकाणे आणि गर्दीच्या परिसरात पोलिसांनी चोख व्यवस्था केली होती. वाहतूक नियंत्रणासह नागरिकांची सुरक्षितता आणि गणेश मंडळांच्या मिरवणुका शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलिसांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद असल्याचे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

गणेशोत्सव हा बेळगावच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक असून, उत्सव यशस्वी होण्यासाठी गणेश मंडळे, नागरिक, प्रशासन आणि पोलीस यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असतो. यंदाच्या उत्सवात पोलीस प्रशासनाने दाखविलेली तत्परता, संयम आणि कर्तव्यनिष्ठेमुळे गणेशोत्सवाची सांगता शांततामय वातावरणात झाली, असे यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी रमाकांत (दादा) कोंडुसकर यांनी बेळगाव पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस, बंदोबस्त पथके आणि संबंधित प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलिसांनी केलेले कार्य समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

या भेटीप्रसंगी महामंडळाचे रणजीत पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर, शिवराज पाटील, संजय शिंदे, कपिल भोसले, प्रशांत भातखंडे, जयराज हलगेकर, प्रसाद मरगळे, महेश जाधव, प्रदीप अलकुंटे आणि रवी साळुंखे उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाचे सहकार्य आणि नागरिकांचा संयमी सहभाग यामुळे बेळगावचा गणेशोत्सव शांतता, शिस्त आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडल्याचा विश्वास महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + 4 =

error: Content is protected !!