इस्कॉन बेळगावमध्ये राधाष्टमी उत्साहात साजरी

इस्कॉन बेळगावमध्ये राधाष्टमी उत्साहात साजरी

बेळगाव : इस्कॉन चळवळीत श्रीमती राधाराणी यांचा जन्मदिन ‘राधाष्टमी’ म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. त्यानिमित्त बेळगाव इस्कॉनच्या वतीने शनिवारी श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत राधाष्टमी उत्सवाचा आनंद घेतला.

उत्सवाची सुरुवात पहाटे मंगल आरती व शृंगार दर्शनाने झाली. त्यानंतर रशियाहून आलेले ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्ती विज्ञान गोस्वामी महाराज यांचे राधाष्टमीनिमित्त प्रवचन झाले.

प्रवचनात राधाराणी यांच्या जीवनाचे महत्त्व स्पष्ट करताना भक्ती विज्ञान गोस्वामी महाराज म्हणाले की, वृंदावन हे भगवान श्रीकृष्णांच्या विविध लीलांचे स्थान आहे. या ठिकाणी राधाराणी या भगवंतांच्या सर्वात जवळच्या सखी होत्या. त्यांनी भगवान श्रीकृष्णांना सर्वाधिक आनंद प्रदान केला. त्यामुळे भगवंतांच्या जीवनात राधाराणी यांचे स्थान अनन्यसाधारण आहे.

धर्माचे सार प्रेम असून प्रेमाचे सार भाव आहे, असे सांगताना त्यांनी आध्यात्मिक साधनेचे महत्त्वही स्पष्ट केले. माणसाला पूर्वजन्मी आणि या जन्मात लागलेल्या अनेक वाईट सवयी दूर करून शुद्ध होणे कठीण असते. मात्र अध्यात्माच्या मार्गावर येऊन निष्ठेची अवस्था प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचे मन शुद्ध होते आणि त्याला आपल्या दिव्य स्वरूपाची जाणीव होते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी भक्ती विज्ञान गोस्वामी महाराज यांचे आभार मानले. भक्तीत येण्यापूर्वी ते वैज्ञानिक होते. गेल्या ४५ वर्षांपासून त्यांनी इस्कॉन चळवळीत आपले जीवन समर्पित केले असून रशिया, फिनलँडसह अनेक देशांमध्ये आव्हानात्मक परिस्थितीतही इस्कॉन चळवळीचा प्रसार केला आहे. आपल्या मधुर वाणीच्या माध्यमातून त्यांनी भक्तीचे गूढ व सूक्ष्म तत्त्व अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केले, असे भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी सांगितले.

यानंतर भक्ती विज्ञान गोस्वामी महाराज यांनी भाविकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर भजन व कीर्तनाचा कार्यक्रम झाला.

सायंकाळी ६ वाजता राधाराणींचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे राधाष्टमीनिमित्त प्रवचन झाले. रात्री साडेआठ वाजता महाआरती करण्यात आली. उत्सवाची सांगता भाविकांना महाप्रसादाचे वितरण करून करण्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 4 =

error: Content is protected !!