मंगसुळी : मंगसुळी परिसरात वारंवार आणि अनियमित वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या वेळेत वीज उपलब्ध होत नसल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत आहे.
वीजपुरवठ्याचे कोणतेही निश्चित वेळापत्रक नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देणे धोकादायक ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना या अनियमित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. विशेषतः परीक्षांच्या काळात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
लोडशेडिंगचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना ठरावीक वेळेत सुरळीत वीजपुरवठा करावा, तसेच नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वीजपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच KEB कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे संबंधित विद्युत विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
