मनपा-टपाल विभागात करार; जन्म-मृत्यू दाखले आता मिळणार घरपोच

मनपा-टपाल विभागात करार; जन्म-मृत्यू दाखले आता मिळणार घरपोच

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेकडून दिले जाणारे जन्म व मृत्यू दाखले आता नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. महापालिका आणि टपाल विभागाच्या बेळगाव विभागामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे हे दाखले टपालाद्वारे थेट अर्जदाराच्या पत्त्यावर घरपोच पाठविण्यात येणार आहेत.

या सुविधेमुळे दाखले घेण्यासाठी महापालिका कार्यालयात वारंवार जाण्याचा नागरिकांचा त्रास कमी होणार असून, वेळ आणि प्रवास खर्चाचीही बचत होणार आहे.

यासंदर्भात शुक्रवारी (ता. ११) महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्या कक्षात बैठक झाली. यावेळी आयुक्त कार्तिक एम. आणि टपाल विभागाच्या बेळगाव विभागाच्या वरिष्ठ अधीक्षक आरूषी शर्मा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करताना नागरिकांनी दाखला टपालाद्वारे घरपोच हवा असल्याचे स्पष्ट करून संपूर्ण पत्ता व आवश्यक संमती अर्जासोबत द्यावी लागणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखले वितरण विभागाकडून संबंधित दाखला टपाल विभागामार्फत अर्जदाराच्या पत्त्यावर पाठविण्यात येईल.

नागरिकांना शासकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता कमी व्हावी आणि सेवा अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आल्याचे आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले. नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जन्म-मृत्यू नोंदणी अधिकारी अशोककुमार सज्जन, टपाल विभागाचे अधिकारी मारुती दोडमनी, अनंतशयन आदी उपस्थित होते.

दरम्यान, दाखला घरपोच पाठविण्यासाठी लागणारे टपाल विभागाचे शुल्क नागरिकांनाच भरावे लागणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 − 6 =

error: Content is protected !!