बेळगाव : प्रतिनिधी
कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या राज्यस्तरीय रँकिंग रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी बेळगाव येथील शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या स्केटिंग रिंकवर होणार आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तर कर्नाटकातील सुमारे १३ जिल्ह्यांमधून ५०० हून अधिक स्केटिंगपटू सहभागी होणार आहेत. त्यामुळे दोन दिवस बेळगावमध्ये स्केटिंगपटूंच्या कौशल्याचा आणि वेगाचा थरार पाहायला मिळणार आहे.
स्पर्धेच्या आयोजनासाठी कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे १२ अधिकृत अधिकारी तसेच सुमारे १५ जणांचा स्पोर्ट्स स्टाफ कार्यरत राहणार आहे. स्पर्धा सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ३० हून अधिक अधिकारी व कर्मचारी विविध जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत.
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने स्पर्धेच्या आयोजनाची जोरदार तयारी करण्यात आली असून, स्पर्धकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व बेळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
