मराठी शाळा टिकविण्यासाठी ‘मोहीम फत्ते बेळगाव’चा पुढाकार

मराठी शाळा टिकविण्यासाठी ‘मोहीम फत्ते बेळगाव’चा पुढाकार

150 मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

बेळगाव : मराठी शाळांचे अस्तित्व टिकून राहावे आणि मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी या उदात्त हेतूने ‘मोहीम फत्ते बेळगाव’ या पेजच्या माध्यमातून एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी मुळचे बेळगावचे व सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले नागराज पाटील तसेच पुणे येथे वास्तव्यास असलेले गजानन कदम यांनी पुढाकार घेत आर्थिक व नैतिक पाठबळ दिले.

या उपक्रमांतर्गत मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला अंकलिपी, दोन वह्या, पेन्सिली आणि रबर देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरणारे हे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुशांत देसाई, स्वप्निल मोटणकर आणि रवी गुंडोजी यांनी स्वतः विविध शाळांना भेटी देत साहित्याचे वितरण केले. त्यांच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळाला.

मराठी शाळा आणि मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढे यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

‘मराठी शाळा टिकली तर मातृभाषेची गोडी आणि संस्कृती टिकेल’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून कौतुक होत असून समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही अशा उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − 6 =

error: Content is protected !!