बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘महामंडळ आपल्या दारी’ या उपक्रमाला यंदाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध गणेशोत्सव मंडळांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी महामंडळाकडून गेल्या महिनाभरापासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याच उपक्रमातून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी चौक येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, केळकर बाग यांचा मंडप उभारणीतील महत्त्वाचा अडथळा दूर करण्यात आला आहे.
डिजिटल जाहिरात स्क्रीन ठरत होता अडथळा
केळकर बाग गणेशोत्सव मंडळाने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर बोलावून महानगरपालिकेने बसविलेल्या डिजिटल जाहिरात स्क्रीनबाबत अडचण मांडली. मंडप उभारण्यात या स्क्रीनच्या पोलमुळे मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
या मंडळाची गणेशमूर्ती गेल्या २३ वर्षांपासून दत्त मंदिराच्या बाजूला मंडप उभारून विराजमान केली जात होती. मात्र, मागील वर्षी मध्यवर्ती महामंडळाच्या विनंतीनुसार आणि सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने मंडळाला बाजूला पर्यायी जागा देण्यात आली होती. मागील वर्षापासून याच जागेवर मंडप उभारण्यात येत होता. मात्र, यावर्षी त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून डिजिटल जाहिरात स्क्रीन बसविण्यात आल्याने मंडळासमोर अडचण निर्माण झाली.
महामंडळाने घेतली तातडीने धाव
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आणि कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी स्थानिक नगरसेवक शंकर पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधत संपूर्ण बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नगरसेवक शंकर पाटील यांनीही तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित डिजिटल स्क्रीन तेथून हटविण्याचे आश्वासन दिले.
अखेर स्क्रीन हटविला
दरम्यान, महानगरपालिका आयुक्तांनी नुकतीच गणेशोत्सव मिरवणूक मार्गाची पाहणी केली होती. त्यावेळीही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अडचणीची माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
महामंडळाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे अखेर डिजिटल जाहिरात स्क्रीन तेथून पूर्णपणे हटविण्यात आला आहे. त्यामुळे केळकर बाग गणेशोत्सव मंडळाच्या मंडप उभारणीतील अडथळा दूर झाला असून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या कामासाठी कोणताही विलंब न लावता गणेश मंडळाला तसेच मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाला सहकार्य केल्याबद्दल नगरसेवक शंकर पाटील यांचे महामंडळाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी मंडळाचे परेश शिंदे, संजय पाटील, दत्ता जाधव यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
