‘बेळगावचा राजा’चा आगमन सोहळा ४ सप्टेंबरला; चव्हाट गल्लीचा डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय

‘बेळगावचा राजा’चा आगमन सोहळा ४ सप्टेंबरला; चव्हाट गल्लीचा डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय

बेळगाव, दि. २ सप्टेंबर २०२६ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘बेळगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक बेळगाव पोलीस आयुक्तालयात पार पडली. गणेशोत्सवातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक, वाहतूक आणि शिस्तीबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस DCP नारायण बर्मनी, ACP संतोष सत्यनायक, मार्केट CPI G.N. कालीमिरची यांच्यासह पोलीस अधिकारी आणि मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

४ सप्टेंबरला ‘बेळगावचा राजा’चा आगमन सोहळा

‘बेळगावचा राजा’ गणेशमूर्तीचा आगमन सोहळा शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक परवानगी देण्यात आली आहे.

चव्हाट गल्लीचा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव

बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे यंदा चव्हाट गल्ली मंडळाच्या वतीने अनंत चतुर्थीच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासोबतच पारंपरिक वाद्यांचा वारसा पुढे नेण्याचा संदेश या निर्णयातून देण्यात येणार आहे. चव्हाट गल्लीला बेळगावच्या गणेशोत्सवाच्या परंपरेत विशेष स्थान असून, येथील शिस्तबद्ध आयोजन इतर मंडळांसाठीही आदर्श ठरावे, अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली.

विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू करण्यावर भर

अनंत चतुर्थीच्या दिवशी ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू करून नियोजित वेळेत विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. मिरवणुकीला होणारा विलंब टाळून प्रशासनाच्या नियोजनाला सहकार्य करण्याची भूमिका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सव काळात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये आणि मिरवणुकीत शिस्त कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासन व मंडळ समन्वयाने काम करणार आहेत.

बैठकीस माजी आमदार ॲड. अनिल बेनके, ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, उपाध्यक्ष प्रशांत कुडे, ज्योतिबा पवार, उमेश मेनसे, सरचिटणीस प्राचार्य आनंद आपटेकर, कार्याध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस प्रशासन आणि ‘बेळगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या समन्वयातून यंदाचा गणेशोत्सव शिस्तबद्ध, पारंपरिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पाडण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + 15 =

error: Content is protected !!