— श्री. वसंत पाटील
निलजी : रणझुंझार परिवार व कै. अशोकराव मोदगेकर प्रतिष्ठानतर्फे समाजाच्या प्रगतीसाठी तळमळीने कार्य करणारे तसेच विविध संघ-संस्थांची उभारणी करणारे कै. अशोकराव नारायणराव मोदगेकर यांचा सहावा स्मृतिदिन निलजी येथे गांभीर्यपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई अशोकराव मोदगेकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून रणझुंझार शिक्षण संस्थेचे संचालक श्री. वसंत पाटील उपस्थित होते.
रणझुंझार हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कै. अशोकराव मोदगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना वसंत पाटील यांनी कै. अशोकराव मोदगेकर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. त्यांनी उदात्त हेतू आणि दूरदृष्टी ठेवून रणझुंझार युवक संघाची स्थापना केली. गावातील युवकांना संघटित करून ज्येष्ठांचे मार्गदर्शन व दातृत्वाच्या पाठिंब्याने सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती, असे त्यांनी सांगितले.
रणझुंझार कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता अक्षिमनी यांनी प्रास्ताविकातून कै. मोदगेकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला. गावात शिक्षणाची ज्ञानगंगा आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. गोरगरीब व गरजूंसाठी केलेली मदत तसेच “चला, उठा आणि संघटित व्हा!” हा त्यांचा विचार आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
नारायण आपटेकर यांनी कै. अशोकराव मोदगेकर यांच्या कार्याचा गौरव करताना, रणझुंझार युवक संघाच्या माध्यमातून त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे पुढे विविध संघ-संस्थांच्या उभारणीद्वारे विशाल वटवृक्षात रूपांतर झाल्याचे सांगितले. पंचक्रोशीत निलजी गावाची ओळख निर्माण होण्यामागे त्यांच्या दूरदृष्टीचे कार्य आणि त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रमेश मोदगेकर यांनी पूर्व भागाच्या विकासासाठी तसेच रणझुंझार परिवारासाठी कै. मोदगेकर यांनी केलेल्या समर्पित कार्याच्या आठवणी सांगितल्या.
स्मृतिदिनानिमित्त रणझुंझार शिक्षण संस्थेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच कै. अशोकराव मोदगेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र निखिल मोदगेकर यांच्या वतीने एस.एस.एल.सी. परीक्षा २०२५-२६ मध्ये रणझुंझार हायस्कूलचा १०० टक्के निकाल लागल्याबद्दल शिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला. संस्थेतील शिक्षक व कर्मचारीवर्गाला गणवेशाचे वितरणही करण्यात आले.
कार्यक्रमाला मारुती गाडेकर, अमर मोदगेकर, भाऊसाहेब मोदगेकर, सिद्राय वर्पे, कपिल गोमाणाचे, प्रिया पाटील, संतोष पाटील, तेजस्वी मोदगेकर, आनंद रजपूत यांच्यासह रणझुंझार परिवारातील पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक वाय. पी. पावले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता देसाई यांनी केले, तर रणझुंझार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सोमनाथ कुरंगी यांनी आभार मानले.
