बेळगाव : मराठा मंडळाच्या म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात रक्षाबंधनाचा सण यंदा अनोख्या आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या मनगटावर विद्यार्थिनींनी राखी बांधून त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त केला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला खानापूर परिसरातील अनेक माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. पी. व्ही. कर्लेकर यांनी रक्षाबंधनाचा पौराणिक इतिहास उलगडून सांगताना सैनिक हा केवळ गणवेशातील व्यक्ती नसून राष्ट्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्या खांद्यावर वाहणारा खरा राष्ट्रसेवक असल्याचे सांगितले. प्रा. टी. आर. जाधव यांनी कारगिल युद्धातील सैनिकांचे शौर्य, त्याग आणि बलिदान यांची माहिती देत उपस्थित वीर जवानांना मानवंदना दिली.
कार्यक्रमाच्या मुख्य टप्प्यात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उपस्थित सैनिकांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. महाविद्यालयाची जीएस वैशाली गुरव तसेच आफरीन सनदी, सुहाना नालबंद, जोया सनदी, अन्वेषा माने, पलक मकानदार आणि सोनी केरकर यांनी सैनिकांच्या मनगटावर राखी बांधत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यावेळी महिला प्राध्यापकांनीही पुरुष प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून बंधुभावाचा संदेश दिला.
माजी सैनिक संघटनेचे डायरेक्टर सुभेदार एन. बी. झुंजवाडकर यांनी, “सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना बहीण जेव्हा राखी बांधते, तेव्हा तो केवळ धागा नसून संपूर्ण देशाचा विश्वास असतो. युवक-युवतींनी या पवित्र धाग्याचे मर्म ओळखून भारतीय सैन्यात भरती व्हावे,” असे आवाहन केले.
कार्याध्यक्ष सुभेदार गोपाळराव देसाई यांनी रक्षाबंधनाचा सण हा रक्षणाच्या प्रतिज्ञेशी जोडलेला असल्याचे सांगत कारगिल युद्ध आणि ऑपरेशन ब्लू स्टारमधील आपल्या अनुभवांची माहिती दिली. सैनिकांचे जीवन म्हणजे देशासाठी घेतलेली अतूट प्रतिज्ञा असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अरविंद एल. पाटील यांनी स्वतःचे अनुभव कथन करताना सैनिकांच्या त्यागाबद्दलचा आदर व्यक्त केला. “देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना राखी बांधणे आणि त्यांच्या त्यागाचा सन्मान करणे हीच खरी रक्षाबंधनाची भावना आहे,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला माजी सैनिक संघटना खानापूरचे उपाध्यक्ष सुभेदार प्रकाश गवसेकर, नायब सुभेदार देवप्पा पाटील, नायब सुभेदार संतन शावेज बारगज, हवालदार गणपत पाटील, हवालदार राजाराम देवलतकर, हवालदार महादेव तिरवीर, हवालदार मनोहर हट्टीकर आणि हवालदार संदीप अंधारे उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ प्राध्यापक एन. ए. पाटील, मंगल देसाई, सुनिता कणबरकर, आर. व्ही. मरीत्तमण्णावर, वनिता गावडे, नितीन देसाई, प्रशांत पाखरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी चित्रा अर्जूनवाडकर, आर. पी. धबाले, सीमा पाटील आणि सातेरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री शिवणकर यांनी केले.
