भारत विकास परिषदेच्या समूहगीत स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूल सर्वप्रथम

भारत विकास परिषदेच्या समूहगीत स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूल सर्वप्रथम

बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत हिंदी विभागात ज्योती सेंट्रल स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला आकर्षक चषक, रोख ५ हजार रुपये आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. ज्योती सेंट्रल स्कूलची पुढील महिन्यात सिंधनूर येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

लोकगीत स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करत डिव्हाईन प्रॉव्हिडेन्स स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला. हिंदी विभागात लव्ह डेल सेंट्रल स्कूलने द्वितीय, तर डिव्हाईन प्रॉव्हिडेन्स स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. एम. व्ही. हेरवाडकर स्कूल आणि भरतेश इंग्रजी माध्यम स्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. ज्ञान प्रबोधन मंदिर, बालिकादर्श विद्यालय आणि बी. के. मॉडेल हायस्कूलला विशेष पारितोषिकांनी गौरविण्यात आले.

लोकगीत विभागात के. एल. एस. स्कूलने द्वितीय, तर ज्योती सेंट्रल स्कूलने तृतीय क्रमांक मिळविला. एम. आर. भंडारी स्कूल आणि भरतेश हायस्कूलला उत्तेजनार्थ पारितोषिके, तर संत मीरा हायस्कूल, जी. जी. चिटणीस स्कूल आणि स्वाध्याय विद्या मंदिर यांना विशेष पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारत विकास परिषदेचे राज्य प्रभारी सुहास चांडक होते. गौरव अतिथी म्हणून प्राचार्य व्ही. एन. जोशी आणि रामचंद्र तिगडी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक वंदे मातरम्‌ने झाली. भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी परिषदेच्या ध्येयधोरणे व सेवाकार्याची माहिती दिली. लक्ष्मी तिगडी यांनी परीक्षकांची ओळख करून दिली. पंडित नंदन हेर्लेकर, किशोर काकडे आणि आदिनाथ पाटील (चंदगड) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

मुख्य अतिथी सुहास चांडक यांनी देशाप्रती कर्तव्ये, सामाजिक बांधिलकी तसेच भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय, सामाजिक व सांस्कृतिक राष्ट्रसेवेविषयी विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुणा नाईक यांनी केले, तर सेक्रेटरी के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी डी. वाय. पाटील, विनायक घोडेकर, पांडुरंग नायक, डॉ. जे. जी. नाईक, गणपती भुजगुरव, पी. एम. पाटील, अमर देसाई, चंद्रशेखर इटी, पी. जे. घाडी, ॲड. बना कौजलगी, विद्या इटी, मंगल कुलकर्णी, स्मिता भुजगुरव, ज्योती प्रभू, अक्षता मोरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + 11 =

error: Content is protected !!