बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ताशिलदार गल्ली यांच्या वतीने सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिमेढ व खांबापूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
भांदूर गल्ली येथील प्रसिद्ध उद्योजक तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि क्षत्रिय मराठा समाजाचे नेते श्री. महादेवराव चौगुले यांच्या शुभहस्ते मूर्तिमेढ व खांबापूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी बेळगावातील सर्व गणेशोत्सव मंडळांना उत्सवाचे गांभीर्य आणि वेळेचे भान ठेवून मिरवणुका वेळेत काढण्याचे आवाहन केले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन वेळेत व्हावे, यासाठी मंडळांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. महादेवराव चौगुले यांच्या हस्ते मंडळाच्या डिजिटल पावती बुकचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांनी मंडळाला पहिली डिजिटल देणगी म्हणून ११,००१ रुपये देत सहकार्य केले.
याबद्दल मंडळाचे सेक्रेटरी श्री. प्रकाश चौगुले यांनी श्री. महादेवराव चौगुले यांचे स्वागत करून आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष श्री. गजानन पाटील यांनी केले.
यावेळी जननी महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
