मच्छे : येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळेत पालक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी शाळेचा शैक्षणिक विकास, विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
येत्या आठवड्यात शाळास्तरीय वार्षिक क्रीडा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यात शाळेतील ३७ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी समाजातील दानशूर राजू मजुकर, ज्योतिबा बेळगावकर आणि सुहास लाड यांनी टी-शर्ट उपलब्ध करून दिले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टी-शर्टचे वितरण करण्यात आले.
तसेच १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सुमारे ७० विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली होती. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दीपक अंबोलकर यांच्या वतीने वही व पेनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
शाळेचे नवीन प्रभारी मुख्याध्यापक म्हणून शेळके सर यांची नियुक्ती झाल्याबद्दल SDMCच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेत कार्यरत गेस्ट टीचर सोनाली मॅडम आणि स्नेहा मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सहशिक्षिका मोदी टीचर यांनी पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शैक्षणिक सुविधा व योजनांची माहिती त्यांनी दिली. या सुविधांचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी योग्य लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी SDMC अध्यक्ष गजानन छप्रे होते. पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पालक-शाळा समन्वय, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चोपडे सर यांनी केले, तर प्रास्ताविक शेरलेकर मॅडम यांनी केले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असून, पालक, शिक्षक, SDMC आणि समाज यांच्या एकत्रित सहभागातून शाळेच्या प्रगतीला अधिक चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
