केसरेकर कुटुंबीयांची रमाकांत कोंडस्कर यांनी घेतली भेट; मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मराठा समाजाची

केसरेकर कुटुंबीयांची रमाकांत कोंडस्कर यांनी घेतली भेट; मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मराठा समाजाची

२१ ऑगस्टला बेळगावात भव्य मूक मोर्चा; आरोपीला कठोर शिक्षा होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार

बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे मोहन नागप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी निशा मोहन केसरेकर यांची झालेली अमानुष हत्या अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थान आणि समस्त मराठा समाजाने कायदेशीर व सामाजिक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.

या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडस्कर यांनी हेब्बाळ येथील केसरेकर कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी मृत दांपत्याच्या मुलांची आस्थेने विचारपूस केली. या कठीण प्रसंगी पीडित कुटुंबाला एकटे सोडले जाणार नाही, तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे कोंडस्कर यांनी आश्वासन दिले.

मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मराठा समाजाची

केसरेकर दांपत्याच्या दुर्दैवी निधनामुळे त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी अनाथ झाले आहेत. या दोन्ही मुलांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांच्या शिक्षणाची आणि भविष्यातील आवश्यक काळजीची जबाबदारी संपूर्ण मराठा समाज घेणार असल्याचे रमाकांत कोंडस्कर यांनी स्पष्ट केले.

या मुलांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ दिला जाणार नाही. त्यांच्या भवितव्यासाठी समाजाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

२१ ऑगस्टला बेळगावात भव्य मूक मोर्चा

केसरेकर दांपत्याला न्याय मिळावा आणि हत्या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बेळगावात भव्य शांततापूर्ण मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

हा मोर्चा सरदार हायस्कूल मैदान येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. या मोर्चासाठी बेळगाव शहर पोलिसांकडे रीतसर परवानगी मागण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारकडे फास्ट ट्रॅक खटल्याची मागणी

मोर्चानंतर पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा मानस असल्याचे रमाकांत कोंडस्कर यांनी सांगितले. या भेटीत केसरेकर दांपत्य हत्याप्रकरणाची सविस्तर माहिती शासनाला देऊन खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि आरोपी फरीद अब्दुल शेख याला कायद्यानुसार कठोरात कठोर, मृत्युदंडाची शिक्षा मिळावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच

केसरेकर कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत श्रीराम सेना हिंदुस्थान आणि समस्त मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आरोपीला कायद्यानुसार कठोरतम शिक्षा होईपर्यंत हा कायदेशीर आणि सामाजिक लढा शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार रमाकांत कोंडस्कर यांनी व्यक्त केला.

केसरेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होताना मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी समाजाने स्वीकारण्याची भूमिका घेण्यात आल्याने या लढ्याला सामाजिक आधार मिळाला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 2 =

error: Content is protected !!