मराठी व कन्नड शाळांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मराठी व कन्नड शाळांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मच्छे : येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळा व कन्नड प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी टाऊन पंचायत कार्यालयाच्या आवारात तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर शाळेच्या परिसरात महात्मा गांधी व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष गजानन छप्रे यांच्या हस्ते करण्यात आले. कन्नड शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष देवेंद्र कऱ्यानवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त टाऊन पंचायतचे सीईओ तुकाराम जमखडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या कार्तिक सुधाकर गावडे, अर्णव परशुराम कोलेकर, सार्थक मजुकर, प्रसन्न उदय अगसिमनी आणि पार्वती मळगे यांना सीईओ तुकाराम जमखडी यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

यानंतर दोन्ही शाळांतील सुमारे ७० ते ८० विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली तसेच देशभक्तीपर गीते गायली. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम शिक्षकांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी मराठी शाळेच्या एसडीएमसीच्या वतीने प्राथमिक शिक्षक संघटनेचे सेक्रेटरी मैलार टोरकरी यांचा स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास दोन्ही शाळांचे एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, शिक्षकवृंद, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही शाळांनी संयुक्तपणे स्वातंत्र्य दिन साजरा केल्याने कार्यक्रमाला विशेष उत्साह व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांचे नियोजन यामुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम देशभक्ती, एकता आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सुंदर संगम ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्नड शाळेचे शिक्षक कट्टी सर यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + fourteen =

error: Content is protected !!