बेळगाव : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवनासमोर जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जायंट्स ग्रुपचे बहुसंख्य सदस्य तसेच जायंट्स सखीच्या सदस्या उपस्थित होत्या.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत गरीब कुटुंबातील होतकरू व हुशार विद्यार्थी आकाश राजू हलगीमर्डी याला शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी आकाशला १० हजार रुपयांची मदत केली.
यावेळी आकाशसोबत त्याचे वडील राजू हलगीमर्डी उपस्थित होते. मुलाच्या शिक्षणासाठी मिळालेल्या मदतीबद्दल त्यांनी अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावत सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रेरणादायी ठरला.
