बेळगाव : कर्नाटक ज्युडो असोसिएशन, बेंगळुरू यांच्या मान्यतेने ४३ वी कर्नाटक मिनी व सब-ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिप २०२६-२७ चे आयोजन बेळगावमध्ये करण्यात आले आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा २१ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत डी.वाय.ई.एस. ज्युडो हॉल, बेळगाव येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन बेळगाव ज्युडो असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले असून, कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतील मिनी व सब-ज्युनियर गटातील शेकडो युवा खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. राज्यस्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी आणि भविष्यातील राष्ट्रीय स्पर्धांसाठी स्वतःला सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी खेळाडूंना मिळणार आहे.
ज्युडो या खेळाद्वारे शिस्त, आदर, आत्मविश्वास, मानसिक व शारीरिक सामर्थ्य तसेच क्रीडाभावना विकसित करण्याबरोबरच युवा खेळाडूंना उच्चस्तरीय स्पर्धांसाठी तयार करण्याचा उद्देश या स्पर्धेमागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
याबाबत माहिती देताना ज्युडो फेडरेशन ऑफ इंडिया (JFI) चे उपाध्यक्ष तथा कर्नाटक ज्युडो असोसिएशनचे संयुक्त सचिव देविश्री कदम-पाटील यांनी सांगितले की, राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी बेळगाववर सोपविण्यात आली असून, स्पर्धेसाठी आवश्यक सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतील युवा ज्युडोपटूंना उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजकांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
या स्पर्धेमुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळणार असून, राज्यभरातील ज्युडोपटूंच्या उपस्थितीमुळे शहरात क्रीडामय वातावरण निर्माण होणार आहे.
