बेळगाव : येत्या ४ व ५ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), बेळगाव यांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरासमोर उभारण्यात येणाऱ्या भव्य मंडपाची मुहूर्तमेढ नुकतीच उत्साहात पार पडली.
इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष, ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते मंडपाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यानंतर भजन, कीर्तन आणि महाआरतीचा भक्तिमय कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला.
यावेळी संकर्षण दास, राम प्रभू, नागेंद्र प्रभू, मदन गोविंद दास, वदन्यचैतन्य, गोपालचंद्र प्रभू, नंदनंदन प्रभू, वल्लभ निमाय प्रभू, शंकरराव कडोलकर यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते.
दरम्यान, श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व कार्यकर्ते तयारीच्या कामात जोमाने कार्यरत आहेत. यंदाचा जन्माष्टमी महोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
