बेळगाव, १३ ऑगस्ट : कावेरी पाणीप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आज विविध कन्नड संघटनांनी कर्नाटक बंदची हाक दिली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, शहरातील प्रमुख चौकांसह मध्यवर्ती बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते.
बंदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकात नेहमीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या कमी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, बससेवा सुरू असून प्रवाशांची ये-जा सुरू होती.
दरम्यान, पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसराला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून शहरभर गस्त वाढविण्यात आली आहे.
स्थानिक कन्नड संघटनांनी म्हादई पाणीप्रश्नालाही महत्त्व देत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. तरीही या बंदचा बेळगाव शहरातील दैनंदिन जनजीवनावर फारसा परिणाम झालेला दिसून आला नाही.
शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी आस्थापने आणि इतर व्यावसायिक व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू असून, नागरिकांनीही आपल्या दैनंदिन कामकाजाला प्राधान्य दिल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.
