‘हर घर तिरंगा’ प्रभातफेरीतून राष्ट्रप्रेमाचा जागर; तिरंगा देशाच्या एकतेचे प्रतीक : प्राचार्य डॉ. एस. पी. तलवार

‘हर घर तिरंगा’ प्रभातफेरीतून राष्ट्रप्रेमाचा जागर; तिरंगा देशाच्या एकतेचे प्रतीक : प्राचार्य डॉ. एस. पी. तलवार

कागवाड : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवानंद महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत प्रभातफेरी व जनजागृती रॅली उत्साहात पार पडली. या वेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तलवार यांनी तिरंगा ध्वज हा देशाच्या एकता, अखंडता, सार्वभौमत्व आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असल्याचे सांगत प्रत्येक भारतीयाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे ही राष्ट्रीय जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. तलवार यांच्या हस्ते तिरंगा ध्वज उंचावून प्रभातफेरीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. यावेळी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट अशोक आलगोंडी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे महत्त्व स्पष्ट करत हा उपक्रम केवळ घरावर ध्वज फडकविण्यापुरता मर्यादित नसून प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेची भावना दृढ करणारे अभियान असल्याचे सांगितले. प्रत्येकाने आपल्या घरावर सन्मानाने तिरंगा फडकवून अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

महाविद्यालयातून सुरू झालेली प्रभातफेरी बसस्थानक, मुख्य रस्ता मार्गे गावाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेण्यात आली. त्यानंतर रॅली राणी चन्नम्मा चौकात आल्यानंतर एनसीसी कॅडेट्सनी मनुष्यसाखळी तयार करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. हातात तिरंगा ध्वज घेऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय हिंद’ आणि ‘हर घर तिरंगा’ अशा घोषणांनी परिसर देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेला.

रॅलीदरम्यान कॅडेट्सनी नागरिकांशी संवाद साधत राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आणि प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले. नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एनसीसी कॅडेट्सच्या जनजागृती मोहिमेचे कौतुक केले.

या प्रभातफेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना, शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि देशभक्तीची जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करून प्रभातफेरीची सांगता केली.

यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, सिनियर अंडर ऑफिसर सूरज न्हावी, ज्युनिअर अंडर ऑफिसर राजश्री काडापुरे, ज्युनिअर अंडर ऑफिसर अनिकेत कांबळे तसेच मोठ्या संख्येने एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 5 =

error: Content is protected !!