युवा समितीच्या पाठपुराव्याला यश; सीमाभागातील मराठी शाळांसाठी पाठ्यपुस्तकांचा मार्ग मोकळा

युवा समितीच्या पाठपुराव्याला यश; सीमाभागातील मराठी शाळांसाठी पाठ्यपुस्तकांचा मार्ग मोकळा

बेळगाव : सीमाभागातील शासकीय मराठी शाळांमध्ये मराठी माध्यमातील पाठ्यपुस्तके वेळेवर उपलब्ध न होणे आणि अप्रत्यक्षपणे कन्नड भाषेची सक्ती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. कर्नाटकच्या शिक्षण विभागाने सीमाभागातील अनेक मराठी माध्यम शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असल्याची अधिकृत कबुली दिली असून, आवश्यक पुस्तकांच्या भाषांतर व उपलब्धतेसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

युवा समितीने जून २०२६ मध्ये बेळगाव येथील शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालकांकडे (DDPI) निवेदन सादर करून ‘कर्नाटक पब्लिक स्कूल्स’ (KPS) मध्ये समाविष्ट झालेल्या मराठी शाळांमध्ये मराठी माध्यमातील पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच ‘मूल्य शिक्षण’ (Value Education) विषयाची पुस्तकेही मराठीत उपलब्ध नसल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आली होती.

या तक्रारीची गंभीर दखल घेत भाषिक अल्पसंख्याक आयोगाने कर्नाटक शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठवून मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व भाषिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर कर्नाटक पाठ्यपुस्तक सोसायटी (KTBS), बंगळुरूने पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असलेल्या शाळांची यादी आणि त्यांचे UDISE कोड मागवले.

१७ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर आणि सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक माहिती बंगळुरूला पाठविण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर २१ जुलै २०२६ रोजी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त, बंगळुरू यांना अधिकृत अहवाल पाठवून सीमाभागातील मराठी शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांची कमतरता असल्याचे मान्य केले.

अहवालानुसार, नियमित मराठी शाळांना पुस्तके देण्यात आली असली तरी ECCE, द्विभाषिक, KPS आणि PM Shri शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तकांचा तुटवडा आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण मिळावे यासाठी पुस्तकांचे भाषांतर करण्यास तातडीने मंजुरी देण्याची शिफारस करण्यात आली असून, बेळगाव आणि चिकोडी जिल्ह्यात यासाठी अनुभवी मराठी शिक्षक उपलब्ध असल्याची माहितीही शिक्षण विभागाने दिली आहे.

शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार बेळगाव शहर, ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील २५ ECCE, १५ द्विभाषिक, २ KPS आणि १ PM Shri अशा एकूण ४३ मराठी माध्यम शाळांना मराठी पाठ्यपुस्तकांची आवश्यकता आहे.

युवा समितीच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांच्या संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून, आता बंगळुरू येथील शिक्षण आयुक्तांकडून भाषांतरास मंजुरी मिळून विद्यार्थ्यांच्या हातात मराठी पाठ्यपुस्तके कधी पोहोचतात, याकडे सीमाभागातील मराठी समाजाचे लक्ष लागले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × three =

error: Content is protected !!