बेळगाव : बेळगावच्या साहसी युवकांनी जगातील सर्वात उंच मोटरेबल रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमलिंग ला (Umling La) या ऐतिहासिक ठिकाणी यशस्वीरीत्या पोहोचत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकविला. समुद्रसपाटीपासून सुमारे १९,०२४ फूट उंचीवर तिरंगा फडकवित त्यांनी देशभक्तीचा आणि साहसाचा अनोखा संदेश दिला.
या दुर्गम आणि आव्हानात्मक प्रवासात सहभागी झालेल्या युवकांनी हा अनुभव आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले. एवढ्या उंचीवर तिरंगा फडकताना पाहण्याचा अभिमान शब्दांत व्यक्त करता येणार नाही. हा प्रवास केवळ साहसाचा नव्हता, तर जिद्द, चिकाटी आणि स्वप्न पूर्ण करण्याचा प्रेरणादायी प्रवास होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या साहसी मोहिमेत किरण गोरल, विनायक चौगुले, प्रसन्न चौगुले, ऋषिकेश जाधव, किरण कदम पाटील, नितीन चव्हाण, श्रीशांत चव्हाण आणि सुरज भोसले यांनी सहभाग घेतला. त्यांच्या या यशाबद्दल बेळगावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
