बेळगाव : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव–धारवाड (कित्तूरमार्गे) रेल्वे मार्ग प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादनाच्या मोबदल्यासाठी कर्नाटक सरकारने ₹७० कोटींचा निधी मंजूर केला असून, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.
सुमारे ७३ किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग केंद्र आणि राज्य सरकारच्या ५०:५० खर्च वाटप तत्त्वावर उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादनाची जबाबदारी कर्नाटक सरकारवर असून, प्रकल्पाच्या एकूण खर्चातील निम्मा वाटाही राज्य सरकार उचलत आहे.
जमीन संपादनामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांनी योग्य आणि वेळेत मोबदला मिळावा, अशी मागणी केली होती. शेतकरी संघटनांनीही सुपीक शेती गमावणाऱ्या कुटुंबांचा विचार करून मोबदला वितरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली होती.
प्रकल्पाची सुरुवातीची अंदाजित किंमत ₹९२७ कोटी होती. मात्र, जमीन संपादनाचा वाढलेला खर्च, बांधकाम साहित्याचे वाढते दर आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीत झालेल्या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पासाठी बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित केली जात आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर बेळगावसह उत्तर कर्नाटकाच्या विकासाला चालना मिळेल आणि या भागाला थेट रेल्वे संपर्काची सुविधा उपलब्ध होईल.
