बेळगाव, प्रतिनिधी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवशंभू ढोल-ताशा पथक, चव्हाट गल्ली, बेळगाव यांच्या वतीने जालगार मारुती मंगल कार्यालय येथे वाद्यपूजन सोहळा उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. ढोल-ताशा आणि इतर पारंपरिक वाद्यांचे विधिवत पूजन करून यंदाच्या सरावाला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी ढोल, ताशा व इतर वाद्यांना गंध, फुले आणि अक्षता अर्पण करून पूजन करण्यात आले. आरतीनंतर ढोल-ताशांच्या गजरात सरावाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला माजी आमदार अनिल बेनके, गजानन मिसाळे, प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी, दिगंबर पवार, विश्वजीत हसवे, सुनील जाधव, भास्कर चव्हाण, बाळू नाईक, शंकर कांबळे, श्रीनाथ पवार, रघु उर्विन, प्रफुल्ल शिरवळकर तसेच पथकाचे अध्यक्ष पवन किल्लेकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
यंदा पथकातील दहावी-बारावीच्या परीक्षेत ८० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले, “वाद्यपूजन हा केवळ धार्मिक विधी नसून युवकांमध्ये शिस्त, संस्कार आणि संघभावना रुजविणारा उपक्रम आहे. बेळगावातील झांज पथकाची सुरुवात चव्हाट गल्लीपासून झाली असून ही परंपरा जपण्याचे कार्य श्री शिवशंभू ढोल-ताशा पथक करत आहे.”
गेल्या दहा वर्षांपासून श्री शिवशंभू ढोल-ताशा पथक बेळगाव शहरासह सीमाभागातील विविध ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने आपली कला सादर करत आहे. पथकाच्या उत्पन्नातील काही हिस्सा दरवर्षी समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी खर्च केला जात असल्याने कला, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श संगम पथकाने घडवून आणला आहे.
वाद्यपूजन, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून आगामी गणेशोत्सवाच्या जल्लोषाची नांदी ठरला.
