बेळगाव शहर पोलिसांना अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन; गुन्हे तपासाला नवे बळ

बेळगाव शहर पोलिसांना अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन; गुन्हे तपासाला नवे बळ

बेळगाव : गुन्हे तपास अधिक वैज्ञानिक, जलद आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने कर्नाटक पोलीस विभागाने राज्य न्यायवैद्यक प्रयोगशाळा (एफएसएल), बेंगळुरू यांच्या सहकार्याने अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन (Mobile Forensic Van – MFV) सेवेला प्रारंभ केला आहे.

या विशेष वाहनामध्ये गुन्ह्याच्या ठिकाणीच वैज्ञानिक पुरावे शोधणे, नोंदविणे, संकलित करणे आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. या व्हॅनमध्ये एकूण १६ फॉरेन्सिक किट्स असून त्यामध्ये क्राइम सीन प्रोटेक्शन किट, रक्त व वीर्य तपासणी किट, डीएनए व लैंगिक अत्याचार पुरावा संकलन किट, शस्त्रास्त्र व स्फोटक तपासणी किट, अमली पदार्थ तपासणी किट, डिजिटल पुरावा संकलन किट, अग्नितपासणी किट तसेच बोटांचे ठसे व पावलांचे ठसे संकलन किटचा समावेश आहे.

याशिवाय हाय इंटेन्सिटी लाईट सोर्स, स्टिरिओ मायक्रोस्कोप, अत्याधुनिक कॅमेरा, लॅपटॉप, प्रिंटर, रेफ्रिजरेटर, जीपीएसयुक्त बॉडी-वॉर्न कॅमेरा, जनरेटर, यूपीएस, फ्लड लाईट, एलईडी स्क्रीन आणि पुरावे सुरक्षितपणे पॅक करण्यासाठी आवश्यक साहित्यही या वाहनात उपलब्ध आहे.

या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनद्वारे सीन ऑफ क्राईम ऑफिसर्स (SOCO) घटनास्थळी तातडीने पोहोचून प्रमाणित कार्यपद्धतीनुसार (SOP) वैज्ञानिक पद्धतीने पुरावे संकलित करतील. त्यामुळे पुरावे दूषित होण्याचा धोका कमी होऊन तपासाची गुणवत्ता वाढणार असून न्यायालयात वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे गुन्हेगारांना शिक्षा होण्यास मोठी मदत होणार आहे.

आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे उघडकीस आणणे, तपास अधिक सक्षम करणे आणि नागरिकांना प्रभावी न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध असल्याचे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − 8 =

error: Content is protected !!