बेळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले.
यावेळी बोलताना किरण जाधव यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाचा गौरव केला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा प्रेरणादायी संदेश आजही प्रत्येक भारतीयामध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि देशसेवेची भावना जागृत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ केली. तसेच केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांद्वारे ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवत भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श घेऊन राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास भाजपा नेते किरण जाधव, राजन जाधव, टिळक चौक रिक्षा अध्यक्ष तसेच भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम देशभक्तीपर घोषणांनी आणि लोकमान्य टिळकांच्या स्मृतींना अभिवादनाने भारावून गेला.
