बेळगाव : मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय विनोदी नाट्याविष्कार ‘वाऱ्यावरची वरात’ याचा प्रयोग अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील प्लेझन्टन शहरात रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी सादर करण्यात येणार आहे. ‘बे फ्रेंड्स’ यांच्या आयोजनाखाली आणि ‘कुंकु प्रॉडक्शन्स’च्या निर्मितीत हा प्रयोग जय गणेश स्टुडिओ, विलो रोड येथे सायंकाळी ४ वाजता रंगणार आहे.
पु. ल. देशपांडे यांच्या मूळ लेखनावर आधारित या नाट्याविष्काराचे संपादन मेधा मराठे यांनी केले असून दिग्दर्शन जगदीश कुंटे यांनी केले आहे.
या प्रयोगात बेळगाव, नाशिक तसेच कॅलिफोर्निया येथील कलाकार सहभागी होत असून, विशेषतः कुंटे आणि कुलकर्णी कुटुंबीयांचा सहभाग आहे. प्रयोगाच्या प्रारंभी भालचंद्र कुंटे हे बेळगावचे कवी अविनाश ओगले यांच्या निवडक विडंबन कवितांचे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर मध्यंतरानंतर ‘वाऱ्यावरची वरात’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून, पूर्वनोंदणीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रयोग आधीच हाऊसफुल्ल झाला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
