पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची विविध गणेश मूर्तीशाळांना भेट; विसर्जन मिरवणूक सुरळीत करण्यासाठी दीड महिना आधीच नियोजन

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची विविध गणेश मूर्तीशाळांना भेट; विसर्जन मिरवणूक सुरळीत करण्यासाठी दीड महिना आधीच नियोजन

बेळगाव (प्रतिनिधी): यंदाच्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि कमी वेळेत पार पडावी, यासाठी बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी आगाऊ नियोजनाला सुरुवात केली आहे. उत्सवाला तब्बल दीड महिना (सुमारे ४५ दिवस) बाकी असतानाच मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत त्यांनी शहरातील विविध गणेश मूर्तीशाळांना भेट देऊन पाहणी केली आणि मूर्तिकारांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

या पाहणी दौऱ्यात मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी तसेच कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर हेही पोलीस आयुक्तांसोबत उपस्थित होते.

पोलीस आयुक्तांनी यदुराप्पा रोड येथील मनोहर पाटील, अनगोळ येथील जे. जे. पाटील, विक्रम व विनायक, मुतगा गावातील एम. जी. पाटील तसेच गुडशेड रोड येथील कुंभार ब्रदर्स यांच्या गणेश मूर्तीशाळांना भेटी दिल्या. या दौऱ्यात सुमारे २०० हून अधिक गणेशमूर्तींची पाहणी करण्यात आली. यावेळी मूर्तिकार संघटनेचे सचिव विनायक मनोहर पाटील यांनी पोलीस आयुक्तांचे वृक्षरोप देऊन स्वागत केले.

मागील वर्षी गणेश विसर्जनावेळी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींचा अनुभव लक्षात घेऊन यंदा त्या टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षी पहिल्या मूर्तीच्या विसर्जनापासून ते शेवटच्या मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत ते स्वतः कपिलेश्वर तलाव परिसरात उपस्थित होते. त्यामुळे विसर्जन प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या सर्व लहान-मोठ्या अडचणींची त्यांना प्रत्यक्ष माहिती आहे.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी मूर्तिकारांना विसर्जन सुलभ होण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. तसेच मूर्तिकारांना कोणतीही अडचण असल्यास त्यांनी थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले.

या विशेष मोहिमेदरम्यान मार्केट, खडेबाजार, शहापूर, मारीहाळ आणि उद्यमबाग पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांच्या या सकारात्मक आणि दूरदृष्टीच्या उपक्रमाचे सर्व मूर्तिकारांनी स्वागत करत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या आगाऊ नियोजनामुळे यंदाची बेळगावची गणेश विसर्जन मिरवणूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि कमी वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + 8 =

error: Content is protected !!